मुलींचे सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी 'लिनेस क्लब'चा स्तुत्य पुढाकार; अशोक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सेल्फ डिफेन्स शिबिराचे आयोजन.
समाजात वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींचे भविष्य सुरक्षित व्हावे आणि त्या शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, या उदात्त हेतूने 'लिनेस यूक्लब' च्या वतीने अशोक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ६ वर्षांवरील मुलींसाठी पाच दिवसीय 'सेल्फ डिफेन्स व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे' आयोजन करण्यात आले. लिनेस क्लबने केवळ एक उपक्रम म्हणून नाही, तर विद्यार्थिनींच्या सर्वांगीण सुरक्षिततेचा आणि उज्ज्वल भविष्याचा विचार करून राबवलेल्या या प्रकल्पाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर लिनेस क्लबतर्फे तयार करण्यात आलेल्या शिबिराच्या आकर्षक डिजिटल बोर्डची फीत अशोक स्कूलच्या समन्वयिका तथा श्रीरामपूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्यान समितीच्या सभापती मंजुश्री मुरकुटे आणि लिनेस क्लबच्या सदस्यांच्या हस्ते कापून शिबिराचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
मान्यवरांचा लिनेस क्लबतर्फे गौरव
या प्रसंगी लिनेस क्लबच्या सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत संघर्ष फाउंडेशन अकॅडमी चे प्रशिक्षक अशोक शिंदे व रेश्मा शिंदे, समन्वयिका मंजुश्री मुरकुटे तसेच शाळेचे मुख्याध्यापक संपत देसाई यांचा लिनेस क्लबच्यावतीने सन्मान करण्यात आला.
लिनेस क्लबच्या प्रेसिडेंट मीनल फुलवर यांनी मुलींना मार्गदर्शन करताना आजच्या काळात स्वसंरक्षणाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, हे अतिशय सोप्या शब्दांत पटवून दिले. "प्रत्येक मुलगी स्वतःचे रक्षण स्वतः करण्यास सक्षम झाली पाहिजे," असे त्यांनी नमूद केले.
क्लबच्या सेक्रेटरी माधुरी सोनवणे यांनी लिनेस क्लबच्या या उपक्रमाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "हा उपक्रम राबवण्यामागे प्रत्येक मुलगी ही अत्यंत आत्मविश्वासू बनली पाहिजे आणि येणाऱ्या कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे तयार झाली पाहिजे, असा उद्देश होता. या दूरदृष्टीनेच लिनेस क्लबने हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे."
मुरकुटे म्हणाल्या की, "लिनेस क्लब हा समाजकार्यात कायमच अग्रेसर राहणारा क्लब आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे आमच्या शाळेतील मुलींना मोठे बळ मिळणार आहे. मुलींनी सुरुवातीला 'मुलांमध्ये जास्त ताकद असते' असे विधान केले होते; मात्र या ५ दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरानंतर मुलींचा हा दृष्टिकोन नक्कीच बदलेल आणि त्या स्वतःला सशक्त समजतील, याची मला पूर्ण खात्री आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचा विस्तृत परिचय मोना हिरे यांनी करून दिला. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक संपत देसाई यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितू गायकवाड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मोनी गोंडे यांनी मानले. विद्यार्थिनींमध्ये एक नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि आत्मसंरक्षणाची प्रेरणा देऊन या शिबिराचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. लिनेस क्लबच्या या उपक्रमामुळे समाजातील मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक सकारात्मक आणि मोलाचा संदेश गेला आहे.
याप्रसंगी क्लबच्या खजिनदार श्रद्धा मिरीकर, दीप्ती दहिमीवाल , दीप्ती दोशी, वर्षा डंबीर, निलेश साठे यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी वृंद कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments