निमगाव खैरी : वाढदिवस म्हटला की केक, खाऊ आणि आनंदाचा उत्सव; मात्र आपल्या आनंदाच्या क्षणात गरजू विद्यार्थ्यांचा आनंद सहभागी करून घेणे ही खऱ्या अर्थाने सामाजिक जाणीव जपणारी गोष्ट आहे. अशाच सुंदर उपक्रमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निमगाव खैरीचे मुख्याध्यापक वाघोजी पठारे सर यांचे सुपुत्र आर्यन वाघोजी पठारे यांचा वाढदिवस संघर्ष वस्तीगृहात विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला.
आर्यनच्या वाढदिवसानिमित्त संघर्ष वस्तीगृहासाठी तेलाचा डबा तसेच विद्यार्थ्यांसाठी खाऊ देण्यात आला. आर्यनने वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसोबत केक कापत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवत आर्यनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वस्तीगृहातील वातावरण काही काळ आनंदाने आणि उत्साहाने भारून गेले.
या प्रसंगी संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशनच्या अध्यक्ष रेश्मा शिंदे, सचिव अशोक शिंदे, सहशिक्षक सिद्धार्थ कांबळे सर तसेच वृषिका कांबळे मॅडम उपस्थित होते. यावेळी वस्तीगृहाच्या वतीने मुख्याध्यापक वाघोजी पठारे सर यांचा तसेच आर्यनचा सत्कार करण्यात आला.
“आपल्या मुलाचा वाढदिवस केवळ स्वतःच्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसोबत साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे, हीच समाजाप्रती असलेली खरी बांधिलकी आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आर्यनच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेली मदत ही वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयोगी ठरणार असून, समाजातील प्रत्येकाने आपल्या आनंदाच्या क्षणात गरजू विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले तर शिक्षणाच्या प्रवाहातील अनेक मुलांच्या आयुष्यात आनंद आणि आशेचा नवा प्रकाश निर्माण होऊ शकतो.
वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेला हा प्रेमाचा आणि मायेचा हात संघर्ष वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर आठवण आणि प्रेरणादायी क्षण ठरला.

Post a Comment
0 Comments